स्पर्धा
हॅलो नमस्कार! माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी आज लिखाण करते आहे .माझ्या ब्लॉगचं
नाव मनाचे पान असे दिलय कारण माझ्या ब्लॉग मध्ये बऱ्याच अंशी
आपल्या मनातल्या गोष्टी राहणार आहेत तसेच अनेक प्रकारचे वेगवेगळे मानसिक आजारंविषयी पण लिखाण
करणार आहे ,कारण मला या विषयातला जवळपास तीस वर्षांचा अनुभव आहे आणि तो सगळ्यांना मिळावा
या दृष्टीने मी माझं हे लिखाण त्याठिकाणी करणार आहे .आजचा लेख 2002 साली एका पुरवणीमध्ये स्त्रीरंग या सदरात छापून आलेला होता त्याचं शीर्षक आहे
“स्पर्धा”.
“शीला ,माझ्याकडे पण तुझ्यापेक्षा हि चांगला फ्रिज आलाय बघ! नवीन घेतला, म्हटलं व्हिडिओकॉन पेक्षा हा चांगला! विजया म्हणाली, “अगं विजया हे बघ मी चार तोळ्यांची एकदाणी केली, आणि पोहेहाराचा सरही केला! शीलाचे हे वाक्य ऐकताच विजयाचा संताप झाला आणि नवीन फ्रीज घेतल्याचा आनंद संपून गेला .आता कधी एकदा सोन्याचा दागिना घडवीन असं तिला वाटू लागलं.
त्यानंतर त्यांची दोघींची भेट जवळपास पंधरा-वीस दिवसांनंतर झाली भेटीत परत हीच चर्चा झाली. विजयांनी शीलाला भिशीचे पार्टीत आपला नेकलेस, कानातलं आणि अंगठी असा सेट दाखवला आणि सगळ्याजणी नेकलेस बघण्यात आणि डिझाईनचे कौतुक करण्यात बिझी झाल्या ते शीलाला सहन झालं नाही आणि जणू विजयाला चिडवायचा तीने विडा उचलला होता. लगेच ती सगळ्यांना म्हणाली, “उद्या
माझ्याकडे या आपण पिक्चर बघू.” मी नवा बीपीएल चा वीसीडी प्लेअर घेतलाय! परत एकदा विजयावर शीलाचा विजय झाला होता.आता विजया परत नवीन कामाला लागणार होती. तर ह्या झाल्या मोठ्या वस्तू, त्यांची तर अगदी छोट्या गोष्टीत देखील स्पर्धा होती . आज काय एकीने प्युअर सिल्क साडी घेतली ,उद्या काय दुसरीने बनारसी घेतली . मी मुलांना व्हिडिओ गेम घेतला, मी मुलांसाठीच कॉम्प्युटर घेतला , मुलाला कम्प्युटर क्लास लावला मुलीला पाच ड्रेस एकदम घेतले , मुलीला गाडी घेतली अगणीत स्पर्धा....एकीचा पाहून दुसरी वरचढ! काहीतरी सांगणार.एकीला कमी लेखण्याची संधी दुसरी कधीच नाही सोडणार.या दोघी खरेच पूर्वीपासून अशाच होत्या का? नाही त्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या.त्यांची मैत्री लग्नानंतरची होती. विजया आणि शीला दोघींचेही पती सरकारी कार्यालयात वेगवेगळ्या पदावर काम करीत होते.या दोघींचे निवासस्थान सरकारी होते. जवळ जवळ होते .वारंवार भेट होई. मुलगा ,मुलगी साधारण समवयस्क होते. शाळेत जाणे ,अभ्यास करणे, सर्व एकत्रच होई. पुढेपुढे शिलाचा पती कोणाच्या संगतीने लाच घ्यायला लागला .आवक वाढवायला त्याला शीलानेच प्रवृत्त केले होते. आलेल्या पैशातून विविध वस्तूंची खरेदी वाढली, पैसा खेळता राहू लागला ,वारंवार शीला पैसा, खरेदी ,चैन असे विषय बोलू लागली. विजया समोर ती अधिक दिमाखात राहत होती .विजया जणू आता तिची स्पर्धक होती ,विजयाला, तिच्या मुली, मुलांना देखील पैशांची गरज वाटू लागली.ते सर्व देखील आपली स्पर्धा शीलाच्या घराशी करू पहात. एके दिवशी भिसी पार्टीत कोणीतरी शीलाचे आणि तिच्या नवऱ्याचे कौतुक केले. सतत नवनवीन वस्तु घेते म्हणजे प्रगतीपथावर आहे असेही म्हटले त्यादिवशी विजया खूप नाराज झाली. घरी आल्यावर तिने पतीशी बोलायचं निर्णय घेतला. त्याच्याशी हिनावल्यासारखे बोलत तिने शिला च्या पतीचे कौतुक केले.तो ही मग रागवला अन शीलाचा पती लाच घेतो हेही त्याने सांगितले. तेवढ्यापुरतीच विजया गप्प राहिली पण नंतर तीनेही हर प्रकारे नवर्याला घरात भरपूर पैसा आणण्यास प्रवृत्त केले.
येनकेन प्रकारेण तोही आज लाच घेऊ लागला .शिलाच्या बरोबरीने विजयाची खरेदी सुरू झाली .स्पर्धा संपली ती शीलाच्या पतीची बदली झाल्यानंतरच .ते दुसरीकडे निघून गेले, पण त्यामागे हौस, स्पर्धा इथेच सोडून गेले. विजया मात्र अजूनही पैशांचा वारेमाप वापर करत होती. तिचा पती तिला तसा पैसा आणून देत होता. पुढे विजयाच्या पतीने पैशांकरीता खोटी मेडिकल बिले बनवण्यास सुरुवात केली. त्यांचे शत्रू वाढले. त्यांनी विजयाच्या पतीची तक्रार केली, त्यातूनच एकदा ते लाच घेत असता पकडले गेले नंतर मात्र घरातील सर्वांची परवड सुरू झाली पुढेही ते सस्पेंड झाले भरपूर मनस्ताप या कुटुंबाने भोगला.
या सर्वनाशाला कारणीभूत आहे ती एकच गोष्ट,स्पर्धा .सतत दुसऱ्या पेक्षा मी वरचढ आहे हे दाखवण्याचा हव्यास ,दुसऱ्यांकडे आहे ते सर्व माझ्याकडे असलेच पाहिजेत याचा हट्ट. भौतिक सुखाची लालसा. सतत सुखातच राहावे,सुखच उपभोगावे हि इच्छा. त्यामुळेच मनुष्य चुकीचे काम करण्यास तयार होतो. जर थोड्या कष्टात राहिलो तर काय असे विशेष घडते ?थोडे सुख ,थोडे दुःख याची सवय होते.दुखात सुखाची आशा वाटते.नेहमी सुख मिळाले तर त्या सुखाचे मोलच राहत नाही.त्यामुळे याहूनही अधिक काही मिळावे असे वाटते.तर कधी सुखही बोचू लागते . मग माणसाने नेहमी सुखाचाच विचार का करावा? फक्त स्वतःच्या सुखाचाच का? करता आले तर दुसऱ्यांच्या सुखासाठी काही करून बघा ना! त्यातही तुम्हाला सुखच मिळेल .घरातील स्त्री सुशिक्षित असेल तर ती संपूर्ण घराला सुशिक्षित करू शकते सुसंस्कारित करू शकते.मग तिने असे पतीला लाच घेण्यास प्रवृत्त का करावे ?अशी स्पर्धा का करावी ?मुलांनाही तसेच वळण का लावावे ?आहे त्यात समाधान का मानु नये?भौतिक सुखाचा विचार तिच्या घराला बरबाद करतो.घरात फ्रीज ,टीवी, वीसीडी, कम्प्युटर ,व्हिडिओ गेम हे सर्व नसेल तर घर चालत नाही का ?या अत्यावश्यक गोष्टी आहेत का?मग यांची किंमत एवढी जास्त असूनही या मार्गाने पैसा मिळवून या गोष्टी घरात जाण्याची गरज काय ?सरळ मार्गाने पैसा कमावूनही या गोष्टी घेता येतात. कदाचित मग कष्ट करूनच वस्तू मिळविल्याचं समाधान लाभेल . घरातील स्त्रीन नेहमी समाधानी असावं हे म्हणूनच कदाचित खरं असेल. लोभी स्वभावामुळे घर बरबाद होते .मग एका निर्जीव वस्तू करिता सर्वांच्या दुःखावर पाणी ओतायचं का?कि समाधानात राहून सुख उपभोगायच ?सुखाच्या शैयेपेक्षा काटेरी गादीला जवळ करायचं ? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख, आनंद, समाधान मिळत असतांना का सर्वांना फसवायचं ,दुखवायचं? लांड्या लबाड्या करून तात्पुरते सुख मिळवायचंआणि, नेहमीकरता ताण-तणाव मिळवायचा, मानसिक स्वास्थ्य घालवायचा की प्रामाणिकपणे काम करून समाधानाने जगायचं हा निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यायचा आहे .स्पर्धा करायची झाली तर खेळाची करा, नुसतीच वस्तू घेण्याची स्पर्धा करून काय फायदा ?
धन्यवाद !

Very true.
ReplyDeleteThank you
DeleteVery well written.
ReplyDelete